Nashik Political News – Chhagan Bhujbal News: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अद्यापही शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, “जिथे कोणी आधीपासून राहत आहे, तिथे आपण कसे राहायला जाऊ? राहत्या माणसाला बाहेर काढणे शक्य नाही, ते आमचेच सहकारी आहेत.”
नाशिकमध्ये (Nashik) सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधताना मंत्री भुजबळ यांनी आपली अडचण मांडली. ते म्हणाले, “मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून मला पत्र मिळाले की अमुक एक शासकीय निवासस्थान तुमच्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात ते घर अजूनही मोकळे नाही. तिथे धनंजय मुंडे सध्या राहत आहेत. त्यांना मी अजूनपर्यंत काहीही सांगितलेले नाही.”
धनंजय मुंडे अजूनही बंगला खाली करत नाहीत
धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नियमानुसार, १५ दिवसांच्या आत त्यांना शासकीय निवासस्थान रिकामे करणे अपेक्षित होते. मात्र, पाच महिने उलटूनही ते अजूनही सातपुडा बंगल्यावर वास्तव्यास आहेत.
त्यांच्यानंतर हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आले असून, २३ मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत अधिकृत आदेशही निघाले. तरीही भुजबळ यांना अद्याप शासकीय निवासस्थान मिळालेले नाही, त्यामुळे त्यांचा गृहप्रवेश अद्याप रखडलेला आहे.
आता पुढे काय? (Chhagan Bhujbal News)
छगन भुजबळ यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे आता सर्वांची नजर राज्य सरकार व सामान्य प्रशासन विभागाकडे लागली आहे. ते धनंजय मुंडे यांना शासकीय घर सोडण्यास सांगतात का, की मुंडे स्वतःहून निवासस्थान रिकामे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.