मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद आणि झाडगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रात २९,५५० कोटी रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमुळे तब्बल ३८,१२० रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. हे प्रकल्प उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून, सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत.उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पहिला प्रकल्प वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा असून, १९,५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून सिलीकॉन वेफर्स, फॅब आणि एटीएमपी निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातून ३३,००० रोजगार निर्मिती होईल. दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आहे, ज्यात एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन ४,५०० रोजगार संधी निर्माण होतील.
या प्रकल्पांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून, तांत्रिक संशोधन, विकास, आणि लघू, मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. स्थानिक कामगारांसाठी कौशल्य विकासाच्या संधीही निर्माण होतील, ज्यामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल.