टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड; ४१ लाखांचा साठा हस्तगत

टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड; ४१ लाखांचा साठा हस्तगत

टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड; ४१ लाखांहून अधिक किंमतीचे २०९ किलो गांजा जप्त

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

दिंडोरी (प्रतिनिधी)दिंडोरी तालुक्यातील भातोडे शिवारात टोमॅटो लागवड केलेल्या शेतात गांजाची समिश्र शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वणी पोलिसांनी या प्रकरणी २०९.३२ किलो गांजा जप्त केला असून, याची अंदाजे बाजार किंमत ४१ लाख ८६ हजार ४०० रुपये इतकी आहे.

भातोडे शिवारातील गट क्रमांक ८ मध्ये रंगनाथ सोनू चव्हाण (वय ५२) यांनी टोमॅटोच्या सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी गांजाची झाडे लावली होती, अशी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाली होती. यानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १३ डिसेंबर रोजी सायंकाळी गट क्रमांक ८ मध्ये छापा टाकला.

छाप्यादरम्यान टोमॅटोच्या सऱ्यांमध्ये ५ ते ६ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून झाडे मुळासकट उपटली व ती जप्त केली. झाडांचा एकूण वजन २०९.३२ किलो भरला.

संशयित रंगनाथ चव्हाण यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकारी देविदास सूर्यवंशी यांनी पाहणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील हे पुढील तपास करत आहेत.

गांजाची किंमत आणि गुन्हेगारी उद्दिष्ट
जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारात अंदाजे किंमत ४१ लाख ८६ हजार ४०० रुपये असून, संशयित आरोपीने विक्रीसाठी ही लागवड केल्याचे समोर आले आहे.