Dengue Nashik : रुग्ण वाढल्याने जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा सतर्क
नाशिक : शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गत पाच महिन्यांत Dengue चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यात (ग्रामीण भाग व मालेगाव महापालिका धरून) दोन हजारांहून अधिक रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी तब्बल 33 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. पावसाळा सुरू होत असल्याने रुग्णसंख्या वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात, तसेच शहरातही डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झालेली दिसत आहे. यंदा एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला अन् त्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. संपूर्ण मे महिना तर मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला होता. वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले होते. यात ताप हे सर्वसाधारण लक्षण आढळणारे मोठे रुग्ण आहेत. त्यामुळे मलेरिया, डेंगी, कावीळ, चिकुनगुनिया किंवा पेशी कमी होणे या कारणासाठी दवाखान्यात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जानेवारीत 8, फेब्रुवारीत 0, मार्चमध्ये 5, एप्रिलमध्ये 109 तर, मे महिन्यात 11 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. मे महिन्यातील बदलत्या वातावरणामुळे रग्णसंख्या वाढली आहे. पावसाळा सुरू होत असल्याने तसेच वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
ग्रामीणपेक्षा शहरात रुग्ण अधिक
दरम्यान, ग्रामीण भागापेक्षा नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या मोठी आहे. ग्रामीणमध्ये (यात 15 तालुक्यांसह मालेगाव महापलिका क्षेत्र) पाच महिन्यांत 33 रुग्ण आढळलेले असताना शहरातही डेंग्यूचे 32 रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य यंत्रणेकडून सुरू असलेल्या उपाययोजना
ज्या गावांत बाधित रुग्ण आढळतील तेथे ग्रामपंचायतीमार्फत प्रबोधन केले जात आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर गावांत धूरफवारणी केली जात आहे. आठवड्यातील एक दिवस कोरडा म्हणून पाळला जातो. स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांमध्ये वाढ होत असते. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते. आवारात मोठी विहीर, तळे असे काही असेल तर त्यामध्ये गप्पी मासे टाकण्यात येत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून डेंग्यूपासून कशी काळजी घ्यावी याचे धडे दिले जात आहेत. यामध्ये पूर्ण कपडे घालावे, मच्छरदाणीचा वापर करावा, डासरोधक वस्तूंचा वापर वाढवावा यांचा समावेश आहे.