देवळाली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२२) देवळालीतील आमदार आहिरे यांना एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या घटनेने देवळालीत आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आ. आहिरे यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच संभाव्य यादीत समोर आली होती, मात्र आता औपचारिकता पूर्ण झाली असून आहिरे यांच्या निवडणुकीसाठी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी देवळाली मतदारसंघात चौदाशे कोटींच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असलेली गावे यंदा विकासाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या कामांचे मोठे कौतुक केले जात असून, आहिरे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे जोरदार समर्थन होत आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या या जल्लोषपूर्ण वातावरणात देवळालीत आ. आहिरे यांच्या पुन्हा एकदा विजयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.