नाशिक: बालगृहातून बाहेर पडलेल्या १८ वर्षावरील अनाथ मुलांना पालकत्वाची छत्रछाया देत तर्पण फाउंडेशनने दाखविलेली दिशा आणि शासनाच्या आरक्षण धोरणाचा फलदायक परिणाम शुक्रवारी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षांत सोहळ्यात दिसून आला. या आरक्षणामुळे प्रथमच पाच अनाथ मुले पोलीस उपनिरीक्षक बनली आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या ऐतिहासिक क्षणात अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारणारे तर्पण फाउंडेशनचे प्रमुख आणि भाजप आमदार श्रीकांत भारतीय व त्यांच्या पत्नी श्रेया भारतीय उपस्थित होते. त्यांनी या मुलांसाठी पालकत्वाची जबाबदारी पार पाडून त्यांना आयुष्याचा नवा मार्ग दाखविला आहे.
पहिल्यांदाच पाच अनाथ मुलांचा पोलीस उपनिरीक्षक म्हणून समावेश
तर्पण फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे अभय तेली, सुधीर चौघुले, अमोल मांडवे, जया सोनटक्के आणि सुंदरी जयस्वाल या पाच मुलांनी पोलीस उपनिरीक्षकपद मिळवले. विशेष म्हणजे, प्रशिक्षणादरम्यान अभय तेली यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन बक्षिसे मिळवली.
आमदार श्रीकांत भारतीय यांच्या प्रयत्नांमुळे आरक्षणाचा लाभ
अनाथ मुलांसाठी शिक्षण आणि नोकरीसाठी १% समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. आमदार भारतीय यांनी या मुलांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते.
तर्पण फाउंडेशनचा मोठा विस्तार
तर्पण फाउंडेशनने आतापर्यंत १२६१ अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे. फाउंडेशन १८ वर्षांनंतर मुलांची बौद्धिक क्षमता व मानसिक चाचणी करून त्यांचे पुढील शिक्षण, निवास आणि भोजनाची जबाबदारी घेतो. या प्रयत्नांमुळे फाउंडेशनच्या ८० मुलांनी शासकीय सेवेत प्रवेश मिळवला आहे.
शासनाच्या निर्णयामुळे उज्ज्वल भविष्य
अनाथ मुलांसाठी आरक्षणामुळे त्यांना शासकीय सेवेत संधी मिळू लागली आहे. यामुळे या मुलांच्या आयुष्याला स्थैर्य आणि नवी दिशा मिळाली आहे.