भावपूर्ण वातावरणात नाशिक रोड परिसरात लाडक्या गणरायाला निरोप

nashikroad ganapti visrajan

लाडक्या गणरायाला नाशिक रोड परिसरात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. देवळालीगाव, विहीतगाव, चेहेडी, आणि जेलरोडचा दसक-पंचक घाट येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. नाशिक रोड आणि विशेषतः जेलरोडचे रस्ते गणेश भक्तांनी गजबजून गेले होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मूर्ती संकलन आणि विसर्जनाच्या प्रक्रियेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत परिसरातील नदीकाठांवर गणेश मंडळांची लगबग सुरू होती.

नाशिक रोड परिसरातील जेलरोडचे दसक-पंचक हे गोदाघाट सर्वात मोठे घाट आहेत, आणि दरवर्षी येथे सर्वाधिक गर्दी होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच गणेश भक्तांची पावले गोदाघाटांकडे वळू लागली होती. मोठ्या गणेश मंडळांनी सायंकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढली, परंतु लेसर व डीजेचा वापर यंदा कमी प्रमाणात पाहायला मिळाला. महिलांचा सहभागही लक्षणीय होता, आणि रात्री उशिरापर्यंत विसर्जन चालू होते.

महापालिकेने विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती. मोठ्या सोसायट्यांमध्ये विसर्जनासाठी टँकची सोय करण्यात आली होती, तर शिखरेवाडी, जयभवानी रोडवरील नर्सरी, गाडेकर मळा, जेलरोडचा नारायणबापू चौक, राजराजेश्वरी चौक, सामनगावचे तंत्रनिकेतन, आणि आडगाव ट्रक टर्मिनल येथे कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती.

महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी १४ रथ आणि मूर्ती संकलनासाठी वाहने सज्ज ठेवली होती. विसर्जनानंतर घाटांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली, ज्यात दसक-पंचक घाट, देवळालीगाव, वालदेवी, विहीतगाव, चेहेडी आणि वडनेर गेट परिसराचा समावेश होता. महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी दोन पाळ्यांमध्ये काम करून विसर्जन प्रक्रियेला हातभार लावला.

Leave a Reply