India’s Got Latent समय रैनाने घेतला मोठा निर्णय, यूट्यूबवरील सर्व एपिसोड्स हटवले
India’s Got Latent removed episodes : कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोमध्ये झालेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादिया यांनी एका स्पर्धकाला अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रणवीर आणि समय दोघांवरही चौफेर टीका होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला विचारलं – “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की त्यांच्यासोबत सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?”
रणवीरच्या या प्रश्नावर स्टुडिओमधील वातावरणच बदललं. अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर रणवीरवर संताप व्यक्त करण्यात आला. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
सोशल मीडियावर रणवीर आणि समयला ट्रोलिंग
या प्रकरणामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया दोघांनाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. विशेषतः समय रैनावर प्रश्न उठवले जात आहेत की, अशा वादग्रस्त गोष्टी त्याच्या शोमध्ये का घडल्या? आशिष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा हे दोन अन्य पाहुणेही शोमध्ये उपस्थित होते, त्यांचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत.
समय रैनाने घेतला मोठा निर्णय – सर्व एपिसोड्स हटवले
या वाढत्या वादानंतर समय रैनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड्स त्याच्या यूट्यूब चॅनलवरून हटवले आहेत.
समयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं –
“सध्या जे काही चाललंय, ते हाताळणं मला अवघड जात आहे. मी माझ्या चॅनेलवरून ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड्स हटवले आहेत. या सगळ्यामागे माझा उद्देश फक्त लोकांना हसवण्याचा होता. मी सर्व तपास यंत्रणांना तपासात पूर्ण सहकार्य करेन.”
मुंबई पोलिसांनी सुरू केली चौकशी, कायदेशीर कारवाई होणार?
या प्रकरणावर आता मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रणवीर अलाहाबादियावर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आशिष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजाचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची पुढील कायदेशीर दिशा काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सोशल मीडियावरील कंटेंटवर होणार का कडक नियंत्रण?
या प्रकरणानंतर सोशल मीडियावरील कंटेंटवर अधिक नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे. युट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर विनोदाच्या नावाखाली कितीही आक्षेपार्ह सामग्री दाखवली जाऊ शकते का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.