Latest News : महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक पाठबळ देणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत करणे आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे हप्ते जमा झाले आहेत, ज्यामुळे योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
मात्र, योजनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी या योजनेवर टीका करत म्हटले की, राज्याची तिजोरी लाडकी बहीण योजनेसाठी रिकामी होत आहे. त्यांचा दावा आहे की, सरकारने या योजनेसाठी अपुरे वित्तीय नियोजन केले आहे, ज्यामुळे राज्याच्या इतर आवश्यक प्रकल्पांवर विपरित परिणाम होईल. विरोधकांनी ही योजना बंद व्हावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे योजनेभोवती वाद निर्माण झाला आहे.
या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “विरोधक आता खुलेआम म्हणत आहेत की आम्ही योजना बंद करू, पोलखोल करू. पण कोणाची पोलखोल करणार? कोविड काळातच विरोधकांची पोलखोल झाली होती. जनता या योजनांना विरोध करणाऱ्यांना कधीही साथ देणार नाही.”
मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाची संधी देण्याचा दावा केला. त्यांनी योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असल्याचं सांगितलं आणि विरोधकांना इशारा दिला की, योजनेला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास जनता त्यांना साथ देणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर टीका करत म्हटलं की, “विरोधकांच्या भूमिकेत विसंगती आहे. एकीकडे ते म्हणतात की राज्याकडे या योजनांसाठी पैसे नाहीत, तर दुसरीकडे त्यांच्या नेत्यांनी सत्तेत आल्यास या योजनेतून दिली जाणारी रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे विरोधकांनी ठरवावं की सरकारकडे पैसे आहेत की नाहीत.”
सरकारच्या म्हणण्यानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, आणि महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमावर काम सुरूच राहील. विरोधकांचा विरोध असूनही, या योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सरकारचं मत आहे.