Nashik Politics | आठवडाभरात दोनदा नाशिकमध्ये हजेरी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिवसेना शिंदे गट
Shiv Sena Shinde faction also started preparations for the municipal elections
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मेळावा, बैठकांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटानेदेखील महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, ठाकरे गटाला हादरा देण्याची पूर्ण रणनीती आखली आहे. त्याची सुरुवात नाशिकमधून केली असून, दस्तुरखुद्द शिवसेनेचे मुख्य नेते Eknath Shinde च मैदानात उतरले आहेत. आठवडाभरात दोनदा उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकमध्ये हजेरी लावली. निमित्त जरी लग्नसोहळ्यांचे असले तरी, त्यांच्या दौऱ्यांमुळे घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघत आहे.
शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रभर ठाकरे गटाला हादरे बसत असताना, नाशिक जिल्हा काहीसा स्थिर असल्याचे दिसून येत होते. फुटीच्या काही काळानंतर मोजकेच पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल झाले. मात्र, नेत्यांची फळी ठाकरे सेनेत असल्याने संघटन मजबुत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून मात्र ठाकरे सेनेला लागलेली गळती अद्यापही थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात दोन आजी-माजी आमदारांनी शिंदे सेनेला आपलेसे केल्यानंतर, शहरातील प्रमुख पदाधिकारीही शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. त्यातच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लग्नसोहळ्यानिमित्त आठवडाभरात दोनदा नाशिकमध्ये हजेरी लावल्याने ठाकरे सेनेत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाकरे सेनेतील नाराज सुधाकर बडगुजर भाजप वाटेवर असून, इतर नाराज मात्र शिंदे सेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. यात ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांचे नाव आघाडीवर असून, त्यांनी एकदा नव्हे, तर दोनदा उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला बळकटी मिळत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आठवड्यात दोनदा नाशिकला लग्नसोहळ्यानिमित्त आले असले तरी, त्यांच्या या दौऱ्यांना राजकीय अर्थ प्राप्त होत आहे. विशेषत: त्यांचे दौरे ठाकरे सेनेत अस्वस्थता निर्माण करणारे ठरत असून, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते ठाकरे सेनेला हादरे देण्यात यशस्वी ठरतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटीची ओढ?
उपमुख्यमंत्री Eknath Shinde आठवडाभरात दोनदा लग्नसोहळ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले. त्यांच्या या दौऱ्यात ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांना त्यांना भेटण्याची ओढ अधिक असल्याचे दिसून आले. त्यांच्या दौऱ्यात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतल्याची सुप्त माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.