Mahindra Workers Strike | ‘महिंद्रा’ कंपनीतील 400 कामगारांचा संप; सीनिऑरिटी व ग्रॅच्युइटी नाकारल्याने उद्रेक

Mahindra Workers Strike | 400 workers in ‘Mahindra’ company go on strike; Outrage over denial of seniority and gratuity

इगतपुरी (नाशिक) Mahindra Workers Strike: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतील सुमारे ४०० कंत्राटी कामगारांनी कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. सीनिऑरिटी, ग्रॅच्युइटी व पीएफ यासारख्या मूलभूत हक्क नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कंपनी गेटसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शिवसेना (शिंदे गट) प्रेरित युनियनमुळे व्यवस्थापनाचा विरोध?

महिंद्रा कंपनीतील कंत्राटी कामगारांनी अलीकडेच महाराष्ट्र राज्य कामगार सेना ही युनियन स्थापन केली. ही युनियन शिवसेना (शिंदे गट) समर्थित असल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना विरोध करायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता कामगारांना गेटवरच अडवण्यात आले व कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला, असा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे.

१८-२० वर्षांच्या सेवेनंतरही हक्क नाकारले

या कामगारांनी १८ ते २० वर्षांपासून सातत्याने काम केले असूनही, कंपनीने अचानक त्यांचे जुने करार संपुष्टात आणून नवीन करार लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सीनिऑरिटी, ग्रॅच्युइटी आणि पीएफ सारख्या लाभांपासून वंचित ठेवले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कामगारांनी जेव्हा याबाबत उत्तर मागितले, तेव्हा व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

आंदोलकांची भूमिका ठाम (Mahindra Workers Strike)

कामगारांची मागणी स्पष्ट आहे —
सीनिऑरिटी मान्य करा
ग्रॅच्युइटी आणि पीएफ दिला जावा
मनमानी वर्तन थांबवा

कामगारांनी सांगितले की, “मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नाही.”
यावेळी युनियन अध्यक्ष सागर आढार, उपाध्यक्ष अनिल थोरात, सचिव सोमनाथ कडू, सहसचिव वैभव कुंडगर आदी पदाधिकारी व सर्व कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.

व्यवस्थापनाकडून अश्वासन; पण समाधान नाही

कंपनीचे व्यवस्थापक संदीप गिजरे, सुशील तिवारी, सयाजी जाधव व सुरक्षा अधिकारी प्रतीक पांडे यांनी कामगारांना संप मागे घेण्याचे मौखिक आश्वासन दिले. परंतु ते आश्वासन अपुरे व कामगारांच्या हिताचे नसल्याचे मत युनियन प्रतिनिधींनी व्यक्त केले.