नाशिक Minister Pankaja Munde – राज्यात कृषी खात्याच्या बदलावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र या विषयावर “नो कमेंट्स” अशी ठाम भूमिका घेतली आहे. “मी केवळ माझ्या खात्याकडेच लक्ष देते,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कृषीखात्यावर प्रश्न विचारताच पंकजा मुंडेंचा संयमित प्रतिसाद
नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित ‘एअरोनॉमिक्स २०२५’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाता काढण्यात आल्यानंतरच्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
तसेच, मागील कृषी मंत्र्यांवर लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि निर्माण झालेला वाद यावर प्रतिक्रिया देण्याची पत्रकारांनी विनंती केली असता, त्यांनी विषय टाळत म्हटले —
“अशा प्रकारचे विषय मी घेत नाही. कोण मंत्री आहे किंवा कोणावर आरोप झाले आहेत, याचा मी विचार करत नाही. मी फक्त माझ्या खात्याकडे बघते.”
गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी पंकजा मुंडे यांचा पुढाकार
याच कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
“आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मला वेळोवेळी नाशिकला यावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभाचे सुक्ष्म नियोजन सुरू केले आहे. गोदावरी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे.”
सिंहस्थ कुंभाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व्हावे, अशी कार्यक्रमात अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, यावर त्यांनी सांगितले की, “तो निर्णय घेणे कठीण असले तरी गोदावरीसाठी मी कटिबद्ध आहे.”