जन्म दाखला घोटाळाप्रकरणी मालेगावला गुन्हा दाखल
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक, मालेगाव – मालेगाव शहरात सुरू असलेल्या बनावट जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळ्याने गंभीर वळण घेतले असून, याप्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून, या घोटाळ्यात अज्ञात व्यक्तींनी शासकीय नोंदणी आदेशात फेरफार करून बनावट प्रमाणपत्र तयार केले असल्याचे उघड झाले आहे.(Malegaon News)
यापूर्वी छावणी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले होते. आता या नव्या तक्रारीनंतर एकूण गुन्ह्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. या प्रकरणात माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही तक्रार दिली होती, ज्यामुळे प्रकरण अधिकच गाजू लागले आहे.
बनावट जन्मदाखल्याच्या आधारे पासपोर्टही मिळवले!
या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ४० जणांनी बनावट जन्मदाखल्याच्या आधारे पासपोर्ट काढल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर याप्रकरणात सुमारे २१७ जण फरार असल्याची माहितीही पोलिसांकडून मिळाली आहे. या घोटाळ्यामुळे सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
तहसील कार्यालयाच्या शिक्क्यांचा गैरवापर
तक्रारीनुसार, आरोपींनी मालेगाव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाच्या जन्मनोंदणी आदेशांची नक्कल करून बनावट आदेश तयार केले. या आदेशांवर बनावट शिक्के, सील, जावक क्रमांक आणि सह्या वापरून अधिकृत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात आले. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मालेगाव नायब तहसीलदारांनी दिलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.
महापालिकेचा अधिकारी अटकेत
या गंभीर प्रकरणात मालेगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाचे उपनिबंधक अब्दुल तव्वाब यांना पोलिसांनी अटक केली असून, तपास अधिक खोलात सुरू आहे. घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.