नाशिक Nashik BJP News– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) संघटनात्मक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी खासदार व आमदारांना संघटनेतील प्रत्येक मंडल दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रत्येक माजी खासदार-आमदाराला मिळणार ‘दत्तक मंडल’
प्रदेश भाजप कार्यालयात पार पडलेल्या रणनीती बैठकीत चव्हाण बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की –
“माजी आमदार, खासदारांनी आपापल्या क्षमतेनुसार एक मंडल दत्तक घेऊन तिथल्या कार्यकर्त्यांना संघटनेशी अधिक घट्टपणे जोडावे. यामुळे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, निवडणूक तयारी आणि जनसंपर्क अधिक बळकट होईल.”
रणनीती बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संजय केनेकर, माधवी नाईक, तसेच मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने घटक पातळीवर संघटन बळकट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भाजपचा ‘बूथ ते मतदार’ फॉर्म्युला (Nashik BJP News)
भाजपची ही ‘मंडल दत्तक योजना’ पक्ष संघटनेला बूथ पातळीवर मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहे. या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.