Maratha Soyarik Sanstha : नाशिक – समाजहिताचा वसा घेतलेल्या मराठा सोयरीक संस्थेच्या माध्यमातून अशोक पांडुरंग कुटे आणि जयश्री कुटे या दांपत्याने आतापर्यंत ५,००० पेक्षा अधिक विवाह जुळवले असून, ९३ मोफत वधू-वर मेळावे आयोजित केले आहेत. ही बाब समाजसेवेच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अखंड मराठा समाज, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृहात संस्थेचा ९३ वा मोफत मराठा वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
साध्या पद्धतीने विवाहाचे आवाहन
समाजामध्ये विवाहाच्या वाढत्या अपेक्षा आणि खर्च यामुळे अनेक युवक-युवती विवाहबद्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे विवाहासाठी अपेक्षा कमी करून कमी खर्चात लग्न करण्याचा सल्ला अशोक कुटे यांनी दिला. तसेच, सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवावा असेही त्यांनी सांगितले.
अनेक मान्यवर उपस्थित
या मेळाव्याला मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे, महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी) भागवत, योगेश नाटकर पाटील, डी. जी. पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी जयश्री कुटे, ज्ञानेश्वर कवडे, शरद जगताप, डॉ. संजयकुमार गायधनी, चंद्रभान काशिनाथ मते, शिवाजी हांडोरे, राजाराम मुंगसे, डॉ. प्रतापराव कोठावळे, धनंजय घोरपडे आणि मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याचे सुत्रसंचालन त्रिलोक भांबरे आणि रितू गाडेकर मॅडम यांनी केले.
३० पेक्षा जास्त विवाह निश्चित
या मोफत वधू-वर मेळाव्यासाठी ३०४ वर आणि ११४ वधूंची नावनोंदणी झाली होती. एकूण २,५०० हून अधिक वधू-वर आणि पालक या मेळाव्यास उपस्थित होते. वधू-वरांनी स्वतः स्टेजवर येऊन आपला परिचय दिला. या मेळाव्यातून ३० हून अधिक विवाह निश्चित होतील, असा अंदाज डी. जी. पाटील आणि योगेश पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकरी मुलांच्या विवाहासाठी शासनस्तरावर बैठक
विवाह जुळवण्यात अडचण येणाऱ्या शेतकरी युवकांसाठी सरकारने विशेष योजना आणावी, अशी मागणी अशोक कुटे यांनी केली. तसेच, ज्या एकल म्हणजेच विधवा महिलांचे पुनर्विवाह होत नाहीत, अशा महिलांसोबत काही शेतकरी युवकांना विवाहासाठी तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत अशा सहा विवाह संस्थेच्या माध्यमातून पार पडले आहेत. यासाठी शासनाने अशा विवाहांना प्रोत्साहन आणि आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लवकरच शासनस्तरावर यासंदर्भात बैठक बोलवणार असल्याचे सांगितले.
पुढील मोफत वधू-वर मेळावा पुण्यात
पुढील मोफत वधू-वर मेळावा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (खेड) येथे रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी ७४४७७८५९१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.