मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने निर्विवाद यश मिळवले असून, आता मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात पडद्यामागून खलबते सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत पाचारण करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचा दावा
शिवसेना गटाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवावे, असा आग्रह करण्यात आला आहे. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनीही शिंदे यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली.
भाजपचे केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात दाखल होणार?
भाजप विधिमंडळ पक्षाची नेता निवडीसाठी बैठक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यानंतरच ही बैठक होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राजकीय हालचालींना वेग
महायुतीतील विजयानंतर भाजपमध्ये उत्साही वातावरण आहे. मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे आमदार फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असा आग्रह धरत आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून महायुतीतील पुढील हालचाली महाराष्ट्राच्या राजकीय दिशेला कलाटणी देतील, अशी अपेक्षा आहे.