नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीच्या वतीने शहरात सध्या अडीचशे बस चालविल्या जातात. सप्टेंबर अखेर पर्यंत केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवेंतर्गत आणखी ५० इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल होतील. त्या व्यतिरिक्त शहराला जवळपास अजूनही साडेचारशे बसची गरज लागणार आहे. केंद्रीय शहरी वाहतुक मंत्रालयाने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे पीएम ई-बस सेवेचा आढावा घेतला.
त्यावेळी एक लोकसंख्येला पन्नास बसची आवश्यकता असल्याचे स्पष्टीकरण दिले. सिटीलिंक कंपनीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व कार्यकारी अभियंता बाजीराव माळी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने ८ जुलै २०२१ पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून शहर बससेवा सुरु करण्यात आली. त्यानुसार २०० सीएनजी, ५० डिझेल अशा एकूण २५० बस शहरात धावतात.
पर्यावरणपूरक बससेवेसाठी केंद्र सरकारच्या ‘एन कॅप’ योजनेअंतर्गत ५० इलेक्ट्रिक बसची खरेदीचा निर्णय घेण्यात आला परंतू, योजना बारगळली. त्यानंतर केंद्र सरकारने ‘पीएम ई-बस’ योजनेअंतर्गत महापालिकेला १०० ई-बस पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यात पहिल्या टप्प्यात ५० बसला मंजुरी मिळाली. नाशिकसाठी ‘जेबीएम इकोलाईफ मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची ऑपरेटर कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महापालिकेला ५० बस पुरवठा करण्याची जबाबदारी या कंपनीवर असेल. ई-बस साठी आडगाव ट्रक टर्मिनल येथे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. मार्चमध्ये काम पूर्ण होईल तर सप्टेंबर महिन्यात वीज वितरण कंपनीकडून हायव्होल्टेज वाहिनी टाकली जाईल. सप्टेंबर अखेरीस ई-बस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना देण्यात आली.
बसची संख्या वाढणार
सद्यःस्थितीत अडीचशे बसेस सिटीलिंक कंपनीच्या मार्फत चालविल्या जातात. ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर सेवा दिली जाते. अर्थात ऑपरेटर कंपन्यांना किलोमीटर प्रमाणे महापालिका पैसे अदा करते. ८२ रुपये प्रतिकिलोमीटर असा दर आहे. ई-बसेस साठी ७२ रुपये दर मोजावा लागेल. केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयाने एक लाख लोकसंख्येला ५० बसची आवशक्यता असल्याचे सांगितले.
शहराची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत पोहोचल्याने त्याअनुषंगाने ७५० बसची आवशक्यता आहे. मात्र खासगी वाहनांची संख्या अधिक असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी प्रमाणात होतो. त्यामुळे सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या बस मधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी आहे.