नाशिक: Nashik Crime News बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नाशिकमध्ये एका युवकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन मित्रांनीच विश्वासघात करत पीडिताच्या नावावर मोबाईल फायनान्स करून, मोबाईलचा अपहार केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
फिर्यादी हेमंत माधव आहेर (रा. रविवार कारंजा, नाशिक) यांची बहिणीचे लग्न असल्याने त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी आपला ओळखीचा मित्र प्रतिक सोनटक्के (वय ३५, रा. धनसृष्टी सोसायटी, उपनगर) याच्याशी कर्जासाठी संपर्क साधला. सोनटक्के याने मोबाईल खरेदीच्या माध्यमातून पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
फेब्रुवारी रोजी, क्रोमा शोरूममध्ये नेऊन ICICI बँकेकडून फायनान्स करून सोनटक्के आणि त्याच्या साथीदार सुमीत संजय देवरे (रा. ड्रीम कॅसल, मखमलाबाद रोड) यांनी ७५ हजार रुपये किमतीचा iPhone आणि १५,५०० रुपयांचा दुसरा मोबाईल आहेर यांच्या नावावर खरेदी केला.
नंतर हे मोबाईल सुमीत देवरे याच्या मदतीने विकले गेले. सोनटक्केने मोबाईल विक्रीचे पैसे सायंकाळपर्यंत देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पैसे दिले गेले नाहीत. उलट, फायनान्सचे हप्ते आहेर यांना भरावे लागत आहेत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, प्रतिक सोनटक्केने यापूर्वीही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.