Nashik: नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “स्टॉप अँड सर्च” या अभिनव उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारवाईत पोलिसांनी २५ किमी अंतरापर्यंत थरारक पाठलाग करून गांजाने भरलेले वाहन जप्त केले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आडगाव पोलीस ठाण्याच्या सीआर मोबाईल पथकाचे अंमलदार पोशि पवार बाळकृष्ण व पोहवा गांगुर्डे भाऊराव हे पहाटे २.३० वाजता “स्टॉप अँड सर्च” मोहिमेत कार्यरत होते. लाल रंगाच्या मारुती एसएक्स ४ वाहनाने पोलिसांच्या तपासणीस नकार देत त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचवला आणि तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
नियंत्रण कक्षाने इतर विभागांना माहिती देत आठ पोलीस वाहनांची टीम तयार केली. या टीमने २५ किमी अंतर, २-३ तासांचा पाठलाग करत आरोपींच्या वाहनाला पकडले. पाठलागादरम्यान आरोपींनी चार पोलीस वाहनांना धडक दिली आणि गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला.
वाहनाची झडती घेतल्यावर २८ किलो गांजा सापडला, ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे. पाच आरोपींपैकी चार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितांवर भारतीय दंड संहिता आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यंत धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.