नाशिक | लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी, बुलेट आणि २४ लाखांची फसवणूक; बाप-लेक अटकेत

Nashik | Honda City, Bullet and Rs 24 lakhs fraud on the pretext of marriage; Father-Lek arrested

नाशिक – विवाहाचे आमिष दाखवून एका युवतीच्या कुटुंबाकडून होंडा सिटी कार, बुलेट मोटरसायकल आणि २४ लाख रुपये उकळणाऱ्या बाप-लेकाच्या टोळीला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी विवाहित जीवनाचे स्वप्न दाखवून आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अटक करण्यात आलेले संशयित म्हणजे मुस्तफा मेहबुब जोगीलकर (२६) आणि त्याचे वडील मेहबुब उमरसाहब जोगीलकर. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार युवतीची ओळख मुस्तफासोबत शादी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावर झाली होती. ओळखीनंतर दोन्ही कुटुंबांनी भेटी घेत विवाह ठरवला. या काळात मुस्तफाने नाशिकला येऊन पीडित युवतीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, वधूपक्षाकडून हुंडा म्हणून संशयितांनी होंडा सिटी कार, बुलेट मोटरसायकल आणि २४ लाखांची रोकड घेतली. मात्र, विवाहाआधीच दोघांचा फसवणुकीचा डाव उघडकीस आला.

मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर, गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुस्तफाला पनवेल (जि. नवी मुंबई) आणि त्याच्या वडिलांना खामगाव (ता. म्हसळा, जि. रायगड) येथून अटक केली.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे – मुस्तफा जोगीलकर उर्फ मुस्तफा खान उर्फ हर्षवर्धन उर्फ मोहन पाटील या विविध नावांनी तो शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम, मॅचमॅच, बेटर हाफ, डिव्होर्स मेट्रोमोनी अशा विवाह संकेतस्थळांवर बनावट प्रोफाईल तयार करून महिलांना जाळ्यात ओढत असे. या फसवणुकीत त्याच्या वडिलांचीही भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान फसवणुकीसाठी वापरलेली होंडा सिटी कार आणि बुलेट जप्त केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ, जमादार राजू टेमगर, अंमलदार अरुण होडे, सागर जाधव यांच्या पथकाने केली.