Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकासकामांना वेग आला आहे. सीतागुंफा ते रामकुंड या १.३६ किलोमीटर लांबीच्या मार्गावर रामकाल पथ विकसित करण्यासाठी ६५ कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून रामायणकालीन वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची दिशा ठरवण्यात आली. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, आणि इतर अधिकारी उपस्थित होते. रामकाल पथ प्रकल्प केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या योजनेंतर्गत १०० कोटी रुपयांच्या मंजूर प्रस्तावाचा भाग असून, उर्वरित निधी लवकरच प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
Nashik रामायणकालीन अनुभवाची निर्मिती
प्रकल्पांतर्गत सीतागुंफा ते रामकुंड या परिसरात रामायणातील प्रसंगांवर आधारित भित्तीचित्रे, पुतळे, दीपस्तंभ, कमानी, आणि आकर्षक विद्युत रोषणाईची योजना आखली आहे. पर्यटकांना ऐतिहासिक आणि पौराणिक वातावरण अनुभवता यावे यासाठी सुशोभिकरणावर विशेष भर देण्यात येईल.
Nashik भाविकांसाठी विशेष सुविधा
रामकुंड परिसरात स्नानासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था, तसेच राममंदिर आणि पंचवटी परिसरातील सुशोभिकरणाचा भाग प्रकल्पात समाविष्ट आहे. वनवास काळातील श्रीराम व सीता यांच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा देत हा प्रकल्प तयार करण्यात येईल.
पर्यटकांसाठी ‘टुरिस्ट मित्र’ योजना
सिंहस्थासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी महापालिकेने विशेष ‘टुरिस्ट मित्र’ योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक ऐतिहासिक आणि पौराणिक माहिती असणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षित करून त्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. इंग्रजीसह परदेशी भाषा जाणणाऱ्यांनाही प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून परदेशी पर्यटकांना कुंभमेळा आणि परिसराची माहिती देणे सोपे होईल.
मार्च 2026 पर्यंत काम पूर्ण करायचे लक्ष्य
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रकल्पाच्या गुणवत्तेसाठी सूचना दिल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मार्च 2026 पर्यंत निधीचा योग्य वापर करून प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.