नाशिक हे औद्योगिक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे स्थान मानले जाते. परंतु, या क्षेत्रातील कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकच्या औद्योगिक (Nashik MIDC) क्षेत्रात रासायनिक प्रदूषणाचा वाढता धोका
Nashik – अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमधील (Nashik MIDC) नाल्यांमध्ये सर्रास रसायनमिश्रित पाणी सोडण्याच्या घटनांमुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भूगर्भात झिरपलेले हे पाणी विहिरी आणि बोअरवेलपर्यंत पोहोचत असून, नागरिकांना काळ्या, हिरव्या, निळ्या रंगाचे दूषित पाणी मिळत आहे. यामुळे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक संतप्त झाले आहेत.
औद्योगिक क्षेत्रातून होणारे रासायनिक प्रदूषण
परिसरातील दूषित पाणी आणि दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिकांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “सूचना देऊनही प्रदूषण थांबत नसल्यास संबंधित कारखाने बंद करावेत,” असा आग्रह नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
औद्योगिक (MIDC) क्षेत्रांतील रासायनिक कंपन्यांनी दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एचटीपी प्रकल्पांचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही कारखानदार हे नियम धुडकावून दूषित पाणी थेट नाल्यांमध्ये सोडतात. परिणामी, नाल्यांमधून वाहणारे रसायनयुक्त पाणी नदी आणि भूगर्भ पाण्याला बाधित करत आहे.
कृषी क्षेत्रावर परिणाम
नदीत मिसळणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील मासे आणि इतर जीवांना धोका निर्माण झाला आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होऊन माशांच्या मृत्यूच्या घटनाही वारंवार घडत आहेत.
औद्योगिक प्रदूषणामुळे केवळ पिण्याच्या पाण्यालाच नव्हे तर शेतीलाही फटका बसत आहे. रसायनमिश्रित पाणी शेतजमिनीत मिसळल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकरीही त्रस्त झाले आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने याआधीच संबंधित कारखान्यांना नोटीस बजावल्या असून, काहींवर कारवाई केली आहे. पुढील काळात अशा घटनांवर कठोर उपाययोजना केल्या जातील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
औद्योगिक विकासाने रोजगार निर्माण केला असला तरी पर्यावरणाच्या संतुलनाचा मोठा बळी गेला आहे. या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण न आणल्यास भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासह नाशिकच्या पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होईल.