Nashik News : मनपाच्या सफाई कर्मचारी ठेक्यात 134 कोटींची घट, तीन वर्षांचा कालावधी निश्चित

download 57 3

नाशिक: (Nashik News) नाशिक महापालिकेच्या सफाई कर्मचारी आउटसोर्सिंग ठेक्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची घट करण्यात आली आहे. यापूर्वीचा २३७ कोटींचा खर्च कमी करून १०३.९८ कोटी रुपयांच्या सुधारित प्राकलनास मनपा महासभेची नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांची संख्या १,१७५ वरून कमी करून ८७५ करण्यात आली असून, ठेक्याचा कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांवर आणण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

नाशिक महापालिका हद्दीत सुमारे २,१६० किमी लांबीचे रस्ते असून, लोकसंख्येच्या वाढीच्या तुलनेत सफाई कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे १ ऑगस्ट २०२० पासून ‘वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स, नाशिक’ या कंपनीमार्फत ७०० सफाई कर्मचारी पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. हा ठेका ३१ जुलै २०२३ रोजी संपल्यानंतर, नवीन ठेकेदार निवड होईपर्यंत जुन्या ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली आहे.

निविदा प्रक्रियेत बदल

  • पहिल्या निविदेत ८७५ कर्मचारी, ५ वर्षांचा कालावधी, ₹१७६ कोटी खर्चाचा प्रस्ताव.
  • दुसऱ्या निविदेत सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत १,१७५ कर्मचारी, ५ वर्षांचा कालावधी, ₹२३७ कोटी खर्च.
  • केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर ही निविदा रद्द.
  • तिसऱ्या निविदेत कर्मचारी संख्या ८७५ व कालावधी ३ वर्षांपर्यंत मर्यादित; खर्च ₹१०३.९८ कोटी.

सफाई क्षेत्र (Nashik News)

या ठेक्याअंतर्गत नाशिक पूर्व-पश्चिम विभाग, गोदाघाट, महापालिकेची विभागीय कार्यालये, नाट्यगृहे व विविध शासकीय स्थळांची स्वच्छता राखली जाणार आहे.