NMC: नाशिक महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
NMC : नाशिक महापालिकेने काठे गल्ली परिसरातील हजरत सातपीर सय्यद दर्गा ट्रस्टने बांधलेल्या धार्मिक स्थळाच्या भिंतीचे अतिक्रमण शनिवारी (दि. २२) हटवले. हा निर्णय घेताना प्रशासनाने स्पष्ट केले की, वक्फ बोर्डाकडे संबंधित जागेची सुनावणी सुरू असतानाही महसूल प्रशासनाने वक्फ बोर्डाच्या केवळ एका पत्राच्या आधारे सातबाऱ्यावर नोंद घेतली होती.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सहा. जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण यांनी कबुली दिली की, ही नोंद अनवधानाने प्रमाणित करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी स.नं. ४८०/३अ/३ब/६ वरील फेरफार नोंद क्र. २०६४५४ रद्द केली आहे.
सातबाऱ्यावरील वक्फ नोंदीवर काट
सातपीर सय्यद दर्ग्याच्या जागेवरील ट्रस्टच्या नावासमोर आता काट मारण्यात आला आहे. ही नोंद रद्द करण्याची मागणी काही संघटनांसह आमदार देवयानी फरांदे यांनी केली होती.
भाभानगर-काठे गल्ली परिसरात तणाव – पोलिसांचा बंदोबस्त कायम
सातपीर दर्गा ट्रस्टच्या नोंदी रद्द झाल्यानंतर भाभानगर आणि काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अतिक्रमण काढल्यानंतर वाद वाढल्याने अडीच दिवस या भागातील दुकाने तसेच रस्ते बंद ठेवण्यात आले होते.
२४ तासांत तातडीचा निर्णय
अपर तहसीलदार निकम यांनी महसूल प्रांताधिकाऱ्यांकडे नोंद रद्द करण्याचा प्रस्ताव २४ फेब्रुवारीला पाठवला होता. विशेष म्हणजे, या प्रस्तावावर अवघ्या २४ तासांतच निर्णय घेण्यात आला आणि सातबाऱ्यावरील वक्फ नोंद हटवण्यात आली.
वक्फ बोर्डाच्या पत्राची शहानिशा नाही – प्रशासनाची चूक कबूल
न्यायाधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद शेख यांनी महसूल प्रशासनाला पत्र पाठवून २५७.३६ चौ. मीटर जागेवर “सातपीर सय्यद बाबा दर्गा” नाव नोंदवण्याची मागणी केली होती. मात्र, या पत्राची कोणतीही शहानिशा न करता तहसीलदार व तहसीलदार कुळकायदा नाशिक यांनी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी फेरफार नोंद मंजूर केली होती.
वक्फ मंडळाचा पुरावा प्रशासनाकडे नाही
प्रशासनाच्या माहितीनुसार, वक्फ मंडळाने मिळकत त्यांच्या मालकीची असल्याचे कोणतेही पुरावे सादर केलेले नव्हते. त्यामुळे ही नोंद अनवधानाने प्रमाणित झाल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.