पुणे | 26 फेब्रुवारी 2025 – भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांपैकी एक, गेन बिटकॉईन स्कॅम,(Bitcoin Fraud) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल 6600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूर तसेच दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी एकाच वेळी 60 ठिकाणी धाड टाकली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला घोटाळा
2015 मध्ये मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज यांनी गेन बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आणली.
गुंतवणूकदारांना महिन्याकाठी 10% परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यात आली.
2017 मध्ये नांदेडमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला, जिथे 500 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पुढे आली.
या घोटाळ्यामुळे व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांचे मोठे नुकसान झाले.
दुबई इव्हेंट आणि बिटकॉईन प्रलोभन
गेन बिटकॉईनचे प्रमोशन करण्यासाठी दुबईमध्ये एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या एक्स्चेंजवरून बिटकॉईन खरेदी करून गेन बिटकॉईनमध्ये गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. क्लाउड माइनिंग कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली फसवणूक केली गेली.
फसवणुकीनंतरचा डाव आणि मुख्य सूत्रधाराचा मृत्यू
सुरुवातीला गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याची लालूच दाखवून पैसे गुंतवायला लावले गेले. परंतु नंतर अमित भारद्वाज दुबईला पळून गेला. त्याच्याविरोधात देशभरात गुन्हे दाखल झाले आणि नंतर त्याला अटकही करण्यात आली. मात्र, त्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
CBI तपास आणि पुढील कारवाई
CBI ने 60 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले.
गुंतवणूकदारांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीवर सरकारकडून कडक नियम आणण्याची शक्यता आहे.
गेन बिटकॉईनशी संबंधित इतर सहकारी आणि कंपन्यांची चौकशी सुरु आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली कोणीही अशा प्रकारे मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत असेल, तर सतर्क राहा!