Nashik: सोनाराच्या दुकानात हातचलाखीने चोरी करणारे बहिण-भाऊ जेरबंद; नाशिक, पुणे, सोलापूरमधील गुन्ह्यांचा पर्दाफाश

सोनाराच्या दुकानात हातचलाखीने चोरी करणारे बहिण-भाऊ जेरबंद; नाशिक, पुणे, सोलापूरमधील गुन्ह्यांचा पर्दाफाश

हातचलाखीने सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या बहिण-भावाचा पर्दाफाश
Nashik : सोलापूर आणि पुण्यातील गुन्ह्यांचा उलगडा; उपनगर पोलिसांची कारवाई

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik: नाशिकच्या उपनगर पोलिसांनी हातचलाखीने सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या गुजरात येथील बहिण-भावाला अटक करून, नाशिक, सोलापूर आणि पुण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या गुन्हेगारांकडून ६४.०८ ग्रॅम वजनाचे, एकूण ५,३०,८१६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

नाशिक येथील पु.ना गाडगीळ अ‍ॅण्ड सन्सच्या शाखेत दोन अनोळखी व्यक्तींनी हातचलाखीने १४.४८० ग्रॅम व १५.१५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगली. त्याच दिवशी हे संशयित पुन्हा कॅनडा कॉर्नर येथील दुकानात आले असता कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले व पोलिसांना कळवले.

उपनगर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून संशयितांना पंचवटी परिसरातून अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे चंद्रकांत परमार (वय ५५) आणि पुनम शर्मा (वय ५७), राहणार अहमदाबाद, गुजरात, अशी सांगून गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपींनी नाशिकशिवाय सोलापूर आणि पुणे येथेही सोनारांच्या दुकानांत चोरी केल्याचे उघड झाले. चोरलेल्या दागिन्यांची विक्री त्यांनी बडोदरा, गुजरात येथील कारागिरांना केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी बडोदरा येथे जाऊन १५.१५० ग्रॅम वजनाची बांगडी व ४५ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पो.ह.वा. इमरान शेख आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सोलापूर व पुण्यातील चोरीच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जात आहे. पुढील तपास पो.ह.वा. इमरान शेख हे करत आहेत.