कोपरगाव तालुक्यात गून्हेगारी वाढली! सकाळच्या सुमारास साई भक्तांवर हल्ला
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Shirdi : कोपरगाव तालुक्यात गुन्हेगारीचा उद्रेक होत असून आता थेट साईभक्तांच्या वाहनावर हल्ला करून लूटमार करण्यात आली आहे. गुजरातमधील सुरत येथील भाविक आपल्या सहकाऱ्यांसह शिर्डीला (Shirdi) साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. मात्र, अज्ञात ७ ते ८ तरुणांनी त्यांचे वाहन थांबवून बंदूक व धारदार शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८०० रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले.
लुटमारीची धक्कादायक घटना – वेळापूर शिवारात साईभक्तांना लुटले
ही धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात सकाळी ६:३० वाजता घडली. गुजरातमधील मोहित पाटील आणि त्यांचे सहकारी इर्टिगा गाडीतून शिर्डीच्या दिशेने जात असताना अचानक दुसऱ्या एका इर्टिगा गाडीतून आलेल्या ७-८ अज्ञात तरुणांनी ओव्हरटेक करत त्यांचे वाहन थांबवले.
आरोपींनी सुरुवातीला वाद घालत, “तुला गाडी चालवता येत नाही का?” असा सवाल करत वाहनाची काच फोडली. त्यानंतर त्यांनी बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लूटमार केली.
Shirdi पोलिसांचा शोध सुरू – संशयित सीसीटीव्हीत कैद
या घटनेनंतर मोहित पाटील यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
गुन्हेगारी वाढली – भाविक असुरक्षित?
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साईभक्तांवर अशा प्रकारचा हल्ला होणे ही धक्कादायक घटना असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.