काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अकलूज, सोलापूर येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहून त्यांना उत्तम व निरोगी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Sushilkumar Shinde's 84th Birthday Celebrated with Grand Felicitation Ceremony in Akluj: Leaders Across Parties Gather to Extend Best Wishes Sushilkumar Shinde's 84th Birthday Celebrated with Grand Felicitation Ceremony in Akluj: Leaders Across Parties Gather to Extend Best Wishes

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अकलूज, सोलापूर येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहून त्यांना उत्तम व निरोगी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, बजरंग सोनवणे, संजय देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, अन्य मित्र पक्ष, त्यांचे सर्व सहकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण स्वतः महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे आमदार आणि बंधू-भगिनींनो..

आज आपण एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहोत. शिंदे साहेबांचा ८४ वा वाढदिवस, कधी माहित नव्हतं ते ८४ वर्षांचे झाले. माझ्यापेक्षा साडेआठ महिन्यांनी ते लहान आहेत. आत्ताच बघा कसे वाटतात? त्यांचा सत्कार, सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं. पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा हट्ट धरतात मीच बोलणार शेवटी मला त्यांना गमतीने सांगावं लागलं मी बरा आहे. तुमच्यापेक्षा आठ महिन्यांनी का होईना मी थोरला आहे त्यामुळे जास्त भानगडीत आमच्या नादी लागू नका. शेवटी हा तुमचा सन्मान आहे. हजारोंच्या संख्येने लोक इथे आलेत तुमच्या सन्मानासाठी, तुमचे विचार ऐकण्यासाठी.

मला आनंद आहे की, मोहिते परिवाराने हा एक प्रचंड आणि उत्तम सोहळा आयोजित केला. शिंदे साहेबांच्या आयुष्यातील मोठा काळ हा तुम्हा लोकांबरोबर गेला. कष्टाने पुढे आले, मुंबईला गेले, शिक्षण वाढवलं आणि पोलीस खात्याची नोकरी केली, हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली, विधिमंडळात आले, मंत्रिमंडळात आले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले. एवढी प्रगती कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नसते. मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळेपणा हा मलाही कधी जमला नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचे महत्त्वाचे कारण सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि सामान्य माणसाशी बांधिलकी कधीही सोडली नाही. त्याचमुळे आज एवढ्या मोठ्या संख्येने त्यांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही-आम्ही सगळेजण उपस्थित आहोत हे त्यांच्या कर्तुत्वाचे यश आहे.

मी आठवत होतो अनेक गोष्टी जवळून बघितल्या. कधी नाटकात काम केले. हा काय गडी साधा नव्हता. अनेक उद्योग केले, पुण्याच्या लॉ कॉलेजमधून पदवीधर झाले. पोलीस खात्यात सल्यूट मारायला लागले. एक दिवशी मी जाऊन सांगितलं की, सुशीलकुमारजी आता हा खाकी ड्रेस सोडा आणि खादी परिधान करा. खाकी पोलिसांचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा घ्या. त्यांनी हो म्हटलं आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली, ती जागा करमाळ्याची. आम्ही लोकांनी ठरवलं मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो, वसंतदादा अध्यक्ष होते, चव्हाण साहेब होते आणि आम्ही या सगळ्या जणांना पटवलं की अतिशय अभ्यासू आणि भवितव्य असणारा हा तरुण आहे त्यांना करमाळ्यातून जागा द्या. नाही झालं, मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. नोकरी गेली आणि करमाळ्याला तयप्पा हरी सोनवणे नावाच्या गृहस्थांना तिकीट दिलं गेलं. मोठी चिंता होती माझ्यासारख्याला की सरकारी नोकरी त्यांना सोडायला लावली आणि आता आमदारकीही मिळाली नाही करायचं काय? त्यांनी मला धीर दिला. काही काळजी करू नका आपण यातून बाहेर पडू. बाहेर पडायचं ठरवलं आणि दुर्दैवाने काही महिन्यात तयप्पा हरी सोनावणे वारले जागा मोकळी झाली. पुन्हा आम्ही चव्हाण साहेबांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की याच तरुणाला महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी संधी देण्याची गरज आहे. त्यांना तिकीट दिलं आणि ते व मी करमाळ्याला आलो, नामदेवराव जगताप तिथले नेते होते. निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल नामदेवरावांकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती. पक्षाच्या वतीने १५ हजार रुपये त्यांना दिले, निवडणुकीच्या खर्चाचा प्रयत्न झाला आणि अडीच हजार रुपये शिल्लक राहिले. ते अडीच हजार नामदेवरावांनी परत केले हे चारित्र्य होतं. त्या काळातल्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्यासंबंधी. तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्यानंतर हे गृहस्थ थांबलेच नाहीत.

मला आठवतंय की, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे मी त्यांना घेऊन गेलो. मंत्रिमंडळात घ्या म्हणून आमच्याकडून काही झालं नाही पण थोड्या दिवसांनी त्यांना राज्यमंत्री म्हणून केलं. तेव्हा जे सत्तेमध्ये गेले ते आमदार, मंत्री, सीएम, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, पक्षाचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी या सगळ्या जागा या गृहस्थांनी घेतल्या. माणसं जोडली, काम करून दाखवलं, इतिहास निर्माण केला. म्हणून अशा कर्तुत्ववान व्यक्तीला नेतृत्वाने मग ते इंदिराजी असतील, सोनिया गांधी असोत, राजीव गांधी असोत आणि राहुल गांधी असोत या पक्षातल्या सर्व नेत्यांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे कर्तुत्व त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामुळे हे चित्र दिसतंय. तुमचा तालुका, तुमचा जिल्हा महाराष्ट्राचा एक इतिहास निर्माण करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारं सोलापूर शहर. सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व होतं, शौर्य आणि त्याग दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्या सोलापूरचे नेतृत्व अनेक वर्ष सुशीलकुमार यांच्याकडे आलं आणि त्या शहराचा व जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा? याचा आदर्श हा त्यांनी दाखवलेला आहे. ते आणि मी एका दृष्टीने भाग्यवान आहोत. अनेकांबरोबर आम्हाला जिल्ह्यात काम करायला मिळालं. मी स्वतः १९७२ साली पालकमंत्री होतो. शंकररावजी मोहिते पाटील सर्वसामान्य माणसांना संघटित करून, सामान्य माणसांचे नेतृत्व करून एक संस्थात्मक उभारणी कशी करायची असते? याचा आदर्श मोहिते साहेबांनी त्या काळामध्ये दाखवला होता.

नामदेवराव जगतापांसारखी व्यक्ती. माणसं जोडण्याची कला असलेली तेही व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये पाहिलं. मी त्या काळाचा पालकमंत्री असताना जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय दादा होते. उत्तम प्रकारचे काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केले औदुंबर अण्णा पाटील, असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, नामदेवराव जगताप असतील अशी अनेकांची नावे घेता येतील. ही माणसे सामान्य कुटुंबातून आलेली पण सामान्यांचे भलं आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही. या सर्व लोकांसोबत मला किंवा सुशीलकुमार शिंदे यांना काम करण्याची संधी मिळाली, आमच्या व्यक्तिगत जीवनाचा तो ठेवा होता. ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. मला आनंद आहे की शिंदेंनी जे काही कर्तृत्व दाखवलं त्या कर्तुत्वाची नोंद महाराष्ट्राने आणि देशाने घेतली. हे सगळं खरं असलं पण घरच्या लोकांनी नोंद घेणं, घरच्या लोकांनी सन्मानित करणं याला एक वेगळेपणा आहे आणि तो वेगळेपणा आज रणजीतसिंह असेल, धैर्यशील असतील त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज दाखवला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. त्यांनी काही ८४ वय झालं हे डोक्यातून काढा, आपल्याला लांब जायचंय. तुम्ही काही चिंता करू नका. आपण आणखी पुढे जाऊ. कुणी काहीही म्हटलं तरी हातात घेतलेलं काम सोडायचं नसतं हा आपला प्रघात आहे अनेक वर्षांचा. त्यामुळे आपण असंच काम करत राहा, नव्या पिढीला मार्गदर्शन करा, एक कर्तुत्ववान नवीन पिढी महाराष्ट्रात उभी करून यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील एक महत्त्वाच्या राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी पिढी घेईल. या नव्या पिढीच्यामागे तुम्ही मी आणि अन्य सगळे सहकारी हे कटाक्षाने उभे राहू, एवढंच सांगतो आणि त्यासाठी तुमची प्रकृती उत्तम राहो, तुमच्याकडून लोकांची सेवा घडो हेच आवर्जून सांगतो

Leave a Reply