Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा रणनीतिक नाशिक दौरा: पक्षबांधणीसाठी मोठी तयारी!

Uddhav Thackeray

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटात हालचालींना वेग

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षात वाढलेल्या ‘इनकमिंग’मुळे विरोधी पक्षांमध्ये चिंता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातही पक्षांतराची हालचाल सुरू असल्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)१६ एप्रिल रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा

शालिमार चौकातील शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत या दौऱ्याची माहिती देण्यात आली. यावेळी उपनेते सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालांमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी व त्यांच्या मनोधैर्यावर काम करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात तांत्रिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत.

१६ एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन

शिवसैनिकांना नवसंजीवनी देण्यासाठी मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

ठाकरे गटाचे निवडणुकीसाठी रणशिंग

विधानसभा निवडणुकीतील अपयश विसरून ठाकरे गटाने महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. महापालिका निवडणुकीबाबत अद्याप अनिश्चितता असली तरी, पक्ष गाफील न राहता पूर्ण तयारी करत आहे. या शिबिरात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना निवडणुकीसाठी महत्वाचे कानमंत्र देतील.

विविध समित्यांची स्थापना आणि बैठका

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून विभागनिहाय तसेच तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत.

  • ३ ते ५ एप्रिल – नाशिक शहरात विभागनिहाय बैठका
  • ६ ते ९ एप्रिल – जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका

यासोबतच, शिबिराच्या नियोजनासाठी विविध समित्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहेत.