दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पिंपळगाव:नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या कोट्यवधींचा कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. दोन अधिकाऱ्यांचे पथक नाफेड कार्यालयावर पोहोचले. जवळपास तीन तास येथील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती.यावेळी काही शेतकऱ्यांच्या वतीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधत याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून या पथकाने पाहणी केली.केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी व फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. तर कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कष्टाचे दाम न मिळता परस्पर केंद्र शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या प्रोड्यूसर कंपन्या व काही राजकीय लागेबांधे असणाऱ्या पुढाऱ्यांचे चेहरे समोर येणार आहे.मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची एक यादीच व्हायरल झाली होती. या यादीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या सर्वांचा पर्दाफाश झाल्यावर कांदा उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. याच दरम्यान येवला येथील एका शेतकऱ्याने नाफेडमधील कांदा खरेदीतील घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेऊन नाफेडच्या झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या दक्षता पथकात गुजरात येथील नाफेडच्या विभागीय कार्यालयातील सरव्यवस्थापिका वीणा कुमारी आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी कांदा खरेदीतील घोटाळा, गैरप्रकार आणि अनियमितता यांची चौकशी करणार असल्याने नाफेडमधील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेते आणि उत्पादक कंपन्यांची धावपळ सुरू असून अनेकांचे धाबे दणाणले आहे.