नाशिक शहरात अपघातांची मालिका सुरुच – Nashik Accident News! सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) संध्याकाळी शरणपूर पोलिस चौकी सिग्नल परिसरात एक धक्कादायक अपघात घडला. वाहन चालवताना चालकाला अचानक चक्कर आल्याने भरधाव असलेल्या चारचाकीने दोन रिक्षा आणि एक दुचाकी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आणि मागे बसलेला प्रवासी जखमी झाले असून, सर्वांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काय घडले नेमके?
दुपारी ५ च्या सुमारास सातपूरहून त्र्यंबक नाक्याकडे जाणाऱ्या कारचा (MH 15 FT 5774) चालक सिग्नलजवळ आल्यानंतर अचानक बेशुद्ध पडला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने समोर उभ्या असलेल्या दोन रिक्षा (MH 15 FU 3144 आणि MH 15 EH 1138) तसेच दुचाकीला धडक दिली.
वाहनांचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली
अपघातात कारच्या बोनेटचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षांना जबर धडक बसल्याने दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुचाकी कारखाली गेल्याने ती अक्षरशः चिरडली गेली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दुचाकी कारखालून बाहेर काढली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले.
अपघातानंतर काय कारवाई? (Nashik Accident News)
अपघात घडल्यानंतर संबंधित कार सरकारवाडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. शरणपूर चौकी परिसरात वाहतूक गजबजलेली असते, त्यामुळे अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.