Yeola Paithani : येवला पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट जारी

Yeola Paithani : येवला पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट जारी

येवला, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट : महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि हातमाग परंपरेची ओळख असलेल्या येवला पैठणीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित १२व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच सोहळ्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि येवला पैठणीच्या समृद्ध हातमाग परंपरेचे प्रतीक म्हणून विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. येवला पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान येवल्यातील विणकर आणि कारागिरांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती मानली जात आहे.

येवला पैठणी ही केवळ साडी नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आणि पारंपरिक हातमाग कलेची ओळख आहे. हातमागावर अत्यंत बारकाईने आणि कौशल्याने तयार होणाऱ्या Yeola Paithani साडीला पारंपरिक नक्षीकाम, मोर, कमळ, आसावली, नारळी आणि मुनीया यांसारख्या कलाकुसरीमुळे देशभरात विशेष ओळख मिळाली आहे.

येवला पैठणीला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सातत्याने प्रयत्नशील आहेत. येवल्याच्या अर्थव्यवस्थेत पैठणी उद्योगाचे महत्त्वाचे स्थान असून या व्यवसायाशी हजारो विणकर, कारागीर, व्यापारी आणि इतर घटक जोडलेले आहेत. त्यामुळे येवला पैठणी उद्योगाचा विकास म्हणजे केवळ पारंपरिक कलेचे जतन नव्हे, तर हजारो कुटुंबांच्या रोजगाराला आणि आर्थिक स्थैर्याला बळ देण्याचा प्रयत्न आहे.

येवल्यात पैठणी पर्यटन केंद्र उभारण्याच्या माध्यमातून पर्यटकांना पैठणी विणकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया पाहता यावी, पैठणी निर्मितीची परंपरा समजावी आणि स्थानिक विणकरांना थेट बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येवला पैठणी केवळ खरेदीचे केंद्र न राहता ‘पैठणी नगरी’ म्हणून पर्यटनाच्या नकाशावर विकसित होण्यास मदत होणार आहे.

तसेच पैठणी क्लस्टरच्या माध्यमातून येवला परिसरातील विणकरांना कच्चामाल, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन विकास आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. पारंपरिक पैठणी साडीचे जतन करताना आधुनिक ग्राहकांच्या आवडीनुसार नवीन डिझाइन आणि उत्पादन विकसित करण्यासाठीही या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.

राष्ट्रपती भवनातून येवला पैठणीच्या स्मरणार्थ जारी करण्यात आलेले टपाल तिकीट हे येवला पैठणीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या माध्यमातून Yeola Paithani ची ओळख देशभर पोहोचण्यास मदत होणार असून भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पैठणीला अधिक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, प्रदर्शन, फॅशन डिझायनर्सशी सहकार्य, पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून येवला पैठणीला नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने मिळालेला हा सन्मान येवला पैठणी उद्योगाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.