Nashik | प्रतिनिधी
Nashik सोशल मीडियावर ‘गोल्डमॅन’ म्हणून चर्चेत असलेल्या सातपूर येथील व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १४ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हेशाखा युनिट-२ आणि सातपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा गुन्हा उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी रात्री सातपूर बसस्थानकासमोरील कानिफनाथ मंदिर परिसरात ही घटना घडली होती. फिर्यादी टेलरिंग व्यवसाय आटोपून घरी जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर जबरदस्तीने वाहनात प्रवेश करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून मोटारसायकलवरून पसार झाले.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेशाखा युनिट-२ आणि सातपूर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संभाजी विलास कवळे (वय ३०, रा. आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक) याची ओळख पटली.
मात्र आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे विशेष शोधमोहीम राबविली. अखेर २८ मे रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कारवाई करून सुमारे १०.५ तोळे वजनाची आणि १४ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ बटुळे आणि त्यांच्या पथकाने केली.