नाशिक: गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नाशिकपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदोरी आणि सायखेडा गावांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. रात्री अचानक नदीचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने तातडीने कारवाई करत आतापर्यंत सुमारे 400 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.
गोदावरीचे पाणी थेट गावात घुसल्याने अनेक घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी साचले. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खालची आळी परिसरातील अनेक घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले, तर गावातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे सर्वच दुकानांमध्ये पाणी घुसले.
पूरामुळे गावातील वीजपुरवठाही रात्रीपासून खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. अनेकांनी दुमजली घरांच्या वरच्या मजल्यावर आश्रय घेतला, तर काही जण आवश्यक सामान घेऊन गुडघाभर पाण्यातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना दिसले.
चांदोरी आणि सायखेडा गावांना जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. नदीने पात्र सोडल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीही जलमय झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील शाळाही पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, दोन्ही गावांतील सुमारे 400 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. काहींना जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि मंदिरांमध्ये तात्पुरता आश्रय देण्यात आला असून काही नागरिक नातेवाईकांकडे गेले आहेत.
सध्या गावातील पाणीपुरवठा खंडित असल्याने प्रशासनाकडून आरओद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुराच्या पाण्यात नागरिकांनी जाऊ नये, यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असून धोकादायक भागात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.