धमकी प्रकरणात मोठी कारवाई, मुंबई ATS ने केली धडक कारवाई
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना अखेर मुंबई ATS ने अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून ही कारवाई करण्यात आली असून, अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कोण आहेत अटक केलेले आरोपी?
मुंबई ATS ने ताब्यात घेतलेल्या दोघांची ओळख पटली असून त्यांची नावे मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे अशी आहेत.
- मंगेश वायाळ – ट्रक चालक
- अभय शिंगणे – देऊळगाव येथे मोबाईल शॉपीचा मालक
- दोघेही शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
- आरोपी दारूच्या आहारी गेले असून, अभय शिंगणेच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी देण्यात आल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे.
- विशेष म्हणजे मंगेश हा अभयचा मामा आहे.
धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल
गुरुवारी (ता. 20) रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. ई-मेलमध्ये स्पष्टपणे धमकीचा उल्लेख होता, त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी कसा केला आरोपींचा शोध?
- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या धमकीचा तपास सुरू केला.
- तांत्रिक विश्लेषणाद्वारे ई-मेल पाठवणाऱ्यांचा मागोवा घेतला.
- बुलढाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
- मुंबई ATS ने रात्री २ वाजता देऊळगावमध्ये छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले.
- अटक झालेल्या आरोपींना चौकशीसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
धमकीचा हेतू अद्याप अस्पष्ट, तपास सुरू
या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, आरोपींनी हा ई-मेल कोणाच्या सांगण्यावरून पाठवला? त्यामागचा हेतू काय होता? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. धमकीच्या मागे कोणतेही संघटनात्मक कारण आहे का, याचाही तपास सुरू आहे.