सेन्सॉर बोर्डाचा महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावरील आक्षेप – ‘चल हल्ला बोल’च्या निर्मात्यांचा संताप
Chal Halla Bol movie controversy : ‘चल हल्ला बोल’ (Chal Halla Bol)या बहुचर्चित मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. विशेषतः महाकवी नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो…’ ही कविता हटवण्याच्या आदेशामुळे वाद उफाळला आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे आणि विविध सामाजिक संघटनांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
‘कोण नामदेव ढसाळ?’ – सेन्सॉर बोर्डाचा सवाल आणि लोकांचा रोष
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात अकरा कट सुचवले असून, नामदेव ढसाळ यांची कविता हटवण्यास सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक महेश बनसोडे म्हणाले,
“बोर्डाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा उर्मट सवाल केला. ही केवळ ढसाळ यांच्या साहित्यावर नव्हे, तर संपूर्ण बहुजन संस्कृतीवर आघात आहे.”
यामुळे दलित पँथर, युक्रांद आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सेन्सॉर बोर्डविरोधात ‘चल हल्ला बोल’ (Chal Halla Bol)आंदोलन!
या वादानंतर ‘लोकांचे दोस्त’ संघटनेने सेन्सॉर बोर्डविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. संघटनेचे रवि भिलाणे म्हणाले,
“सेन्सॉर बोर्ड जाणून-बुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. याविरोधात आम्ही निर्णायक लढा लढू.”
या मोहिमेला पत्रकार संजय शिंदे, पँथर सुमेध जाधव, लोकशाहीर संभाजी भगत, कॉमेड सुबोध मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, दोस्त पोपट सातपुते, भानुदास धुरी आदी मान्यवरांनी पाठिंबा दर्शवला आहे.
‘चल हल्ला बोल’ – बहुजन लढ्याची हाक
‘लोकांचा सिनेमा’ चळवळीअंतर्गत महेश बनसोडे यांनी लोकवर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम, शेतकरी आणि महिलांच्या हक्काच्या लढ्यावर भाष्य करणारा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या अडचणीत सापडला आहे.
आता प्रश्न उपस्थित होत आहे –
“सेन्सॉर बोर्डची गरज काय?”
बहुजन संस्कृतीवरील बंधनांचा विरोध करत, या प्रश्नावर आता मोठा जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.