मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा एडिट केलेला वादग्रस्त व्हिडिओ viral video सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने वरद तुकाराम कणकी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. तसेच, सायबर सेलने पद्माकर आंबोळकर या दुसऱ्या संशयिताचीही ओळख पटवली असून, त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित वरळी भागातील रहिवासी आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आधीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) यांचा छेडछाड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित करत १२ वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हिडिओतील (viral video)आशय हा सामाजिक अशांतता भडकवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सामाजिक अशांतता पसरवण्याचा कट:
सायबर सेलच्या तपासानुसार, एक्स (माजी ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. भाजपाच्या एका प्रतिनिधीने यावर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात भारत भावला शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, सौरभ सिंग चौहान, मुकेश लव्हाळे, प्रसाद साळवी, वरद कणकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट २३० के आणि विष्णू भोटकर यांच्या सोशल मीडिया खात्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजकीय पार्श्वभूमीची चौकशी सुरू:
सायबर सेलने यातील संशयितांची राजकीय पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य संशयितांचा शोध सुरू केला आहे. आरोपींनी व्हिडिओतील मजकूराचा उपयोग करून अपमानास्पद पोस्ट करून धार्मिक आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे.
राज्य सायबर पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओमधून मुख्यमंत्री फडणवीस यांचा भारतीय राज्यघटनेवर अविश्वास असल्याचे भासवले गेले आहे. तसेच, समांतर राज्य निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा खोटा आरोप व्हिडिओतून करण्यात आला आहे.
सायबर सेलने पुढील चौकशीसाठी आरोपींच्या डिजिटल उपकरणांची तपासणी सुरू केली असून, हा प्रकार कोणाच्या नेतृत्वाखाली झाला याचा शोध घेतला जात आहे.