मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मलिक्कार्जुन प्रसन्ना यांनी शुक्रवारी जारी केले.
निवडणूक आयोगाने मुंबईतील कार्यरत पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्याची सूचना राज्य पोलीस दलाला दिली होती. यानंतर एकूण 111 अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर बदल्या करण्यात आल्या, ज्यात ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण दत्ताराम राणे, रवींद्र परमेश्वर अडाणे, बळवंत व्यकंट देशमुख, आणि मनिषा अजीत शिर्के यांचा समावेश आहे. तसेच, राजीव शिवाजीराव चव्हाण, तानाजी सहदेव खाडे यांना मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
याशिवाय, 11 नवीन अधिकारी मुंबई पोलीस दलात रुजू झाले आहेत, ज्यात शहाजी नारायण पवार (सोलापूर), संजय पंडित पाटील, आणि गजानन दत्तात्रय पवार यांचा समावेश आहे.
हे बदल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक सुरक्षेसाठी करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.