नाशिक | १८ ऑगस्ट २०२६ : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने या कथित हत्येचा उलगडा केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीत मृतदेह कसारा घाटातील जंगल परिसरात फेकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत मृतदेहही शोधून काढला.
५ ऑगस्टपासून बेपत्ता होता वसंत सातपुते
पोलिसांच्या माहितीनुसार, वसंत गोरखनाथ सातपुते (वय ४०, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे ५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ कडूनही सुरू होता.
दरम्यान, पोलिस हवालदार नाझीम खान पठाण आणि अंमलदार मुक्तार शेख यांना या प्रकरणातील संशयित शालीमार परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना देण्यात आल्यानंतर पोलिस पथकाने तातडीने कारवाई केली.
सीबीएस परिसरातून चौघे ताब्यात
सीबीएस परिसरात शोध घेत असताना पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे हसीना हबीब शेख (वय ४४), साहिल रफिक शहा (वय २३), मोईन मुक्तार शहा (वय २४) आणि सरफराज अबरार सैय्यद (वय २२) अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीत हत्येचा कथित उलगडा
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीत वसंत सातपुते हे हसीना शेख आणि साहिल शहा यांच्या कथित प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचे समोर आले. ६ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३ वाजता राहत्या घरी साहिलच्या मदतीने वसंत सातपुते यांची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गोणीत भरून इरटिगा वाहनातून कसारा घाटाच्या दिशेने नेण्यात आल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने मृतदेह घाटातील जंगल परिसरात फेकण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
कसारा घाटातील घनदाट जंगलात मृतदेहाचा शोध
संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकासह पोलिस उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या पथकाने कसारा घाटातील संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली.
घनदाट जंगलात शोध घेतल्यानंतर गोणीत भरलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ, इंदिरानगर पोलिस ठाणे करीत आहेत.
गुन्हे शाखेची महत्त्वाची कामगिरी
सुरुवातीला बेपत्ता व्यक्तीबाबत नोंद झालेल्या प्रकरणाच्या तपासातून कथित हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे वसंत सातपुते यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा कथित प्रकार समोर आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहरच्या पथकाने केली.
टीप : या प्रकरणातील आरोप आणि कबुलीजबाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल.
Nashik Crime, Nashik News, Nashik Murder, Crime News, Kasara Ghat, Indiranagar Police, Nashik Police, Maharashtra Crime, Nashik Latest News, Marathi News, MBC Marathi