Nashik Crime: नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; वैध कागदपत्रे नसल्याचे उघड

Nashik Crime: नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; वैध कागदपत्रे नसल्याचे उघड

नाशिक : बांगलादेशातून भारतात अवैध मार्गाने प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ने नाशिकरोड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. मोहम्मद साकीब मुल्ला (२२) आणि नाहीदा बादशाह मुल्ला (२१) अशी त्यांची नावे आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२चे पथक परदेशी नागरिकांबाबत माहिती घेत असताना पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे आणि पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांना दोघांबाबत गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाशिकरोड बसस्थानकातील पोलीस चौकीजवळ सापळा रचला. त्यावेळी मोहम्मद साकीब मुल्ला आणि नाहीदा बादशाह मुल्ला हे दोघे पोलिसांच्या निदर्शनास आले.

वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे समोर

पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांकडे भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अधिकृत परवानगीशिवाय भारतात प्रवेश केल्याचे सांगितले.

मोहम्मद साकीब मुल्ला हा खुलना राज्यातील नराईल जिल्ह्यातील खुलता येथील, तर नाहीदा बादशाह मुल्ला ही नराईल जिल्ह्यातील सगोलसिरा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गिरी, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने केली. कारवाईमध्ये श्रेणी उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रविण वानखेडे, जितेंद्र वजीरे तसेच नाशिकरोड दामिनी पथकाच्या सोनाली बागुल आणि ज्योती पवार यांचा सहभाग होता.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Nashik Crime, Nashik News, Bangladeshi Citizens Arrested, Nashik Road Crime, Crime Branch Unit 2, Nashik Crime News, नाशिक गुन्हे शाखा, नाशिकरोड पोलीस