Nashik Kumbh Mela News | Simhastha 2027 | Nashik Municipal Corporation
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकासकामांमध्ये विलंब करणाऱ्या चार ठेकेदार कंपन्यांवर नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तब्बल प्रतिदिन 91 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, अन्य तीन ठेकेदारांवर प्रतिदिन 10 हजार रुपयांची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सिंहस्थासाठी (Kumbh Mela) 28 रस्त्यांची कामे सुरू
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे ( Kumbh Mela ) आयोजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविक आणि साधू-महंतांच्या सुविधेसाठी विविध शासकीय यंत्रणांमार्फत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील 28 महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

कामांच्या प्रगतीवर महापालिकेचे लक्ष
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून या कामांवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार प्रगतीचा आढावा घेतला जात आहे.
याशिवाय, कामांचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली आहे. काही कामे नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असली, तरी काही रस्त्यांच्या कामांमध्ये विलंब होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
अंबड लिंक रोडच्या ठेकेदारावर मोठी कारवाई
एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अंबड लिंक रोडचे काम सोपविण्यात आले आहे. या कामात झालेल्या दिरंगाईमुळे संबंधित कंपनीवर प्रतिदिन 91 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दिंडोरी रोड आणि मखमलाबाद रोडच्या कामांनाही फटका
दिंडोरी रोडच्या कामामध्येही विलंब होत असल्याने संबंधित ठेकेदाराला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच, मखमलाबाद रोडच्या कामात अपेक्षित गती नसल्याचे निदर्शनास आल्याने महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीवर प्रतिदिन 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
याशिवाय, अन्य दोन ठेकेदारांवरही प्रतिदिन 10 हजार रुपयांची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.
वेळेत कामे पूर्ण करण्याचे आव्हान
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ( Kumbh Mela ) देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार आहेत. त्यामुळे रस्ते, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे इतर ठेकेदारांनाही कामांचा वेग वाढविण्याचा इशारा मिळाल्याचे बोलले जात आहे.