Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधानपरिषद जागेवर महायुतीत रस्सीखेच; आता राष्ट्रवादीचाही दावा

Nashik Vidhan Parishad Election

नाशिक : विधानपरिषदेच्या ( Vidhan Parishad) नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही या जागेवर दावा केला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये आधीपासूनच सुरू असलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार बनली आहेत.

मंगळवारी (दि.२६) राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांची भेट घेत नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने त्यामध्ये नाशिकच्या जागेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vidhan Parishad भाजप आणि शिंदेसेनेतही जोरदार लॉबिंग

नाशिकची जागा यापूर्वी शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी भाजपनेही या जागेवर जोरदार दावा ठोकला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नाशिक आणि संभाजीनगरच्या जागांबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.

भाजपकडून गणेश गिते, नीलेश बोरा यांच्यासह भूषण कासलीवाल यांचे नावही चर्चेत आले आहे. चांदवड परिसरात पक्ष वाढवण्यात कासलीवाल कुटुंबाचे योगदान असल्याने त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या दावेदारीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडून अॅड. शिवाजी सहाणे चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अॅड. शिवाजी सहाणे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा त्यांची उमेदवारी चर्चेत आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ आणि अॅड. शिवाजी सहाणे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज विक्रीला वेग

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत १७ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. मात्र अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

मंगळवारी विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज खरेदी केले. समाजवादी पार्टीचे शाने हिंद निहाल अहमद, इस्लाम पार्टीचे मोहम्मद खालिद अब्दुल रशीद, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण यांनी अर्ज घेतले. तसेच काही अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून, पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.