Nashik Cyber Fraud News | KYC Update Scam | Online Banking Fraud
नाशिक : केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर (Cyber Crime) भामट्याने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 2 लाख 35 हजार 198 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक अधिकाऱ्याचे सोंग घेऊन फसवणूक (Cyber Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी असलेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना 3 जून रोजी सायंकाळच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख एका बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजर म्हणून करून दिली.
त्याने पीडित व्यक्तीला बँक खात्याचे केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी बँकेशी संबंधित विविध माहिती देत त्यांची दिशाभूल करण्यात आली.
OTP आणि कार्डची माहिती मिळवून खाते रिकामे
सायबर भामट्याने केवायसी प्रक्रियेसाठी मोबाईलवर आलेला OTP, तसेच डेबिट कार्डवरील संवेदनशील माहिती मागवली. ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आवश्यक माहिती दिली.
यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून विविध व्यवहारांद्वारे 2 लाख 35 हजार 198 रुपये वळते करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल
फसवणुकीची बाब लक्षात येताच संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तसेच संबंधित बँकेशी संपर्क साधून व्यवहारांची माहिती आणि तांत्रिक तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
