Nashik | प्रतिनिधी
Nashik : नाशिकरोड परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या भूमिगत केबलची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलच्या दूरसंचार सेवेसाठी वापरण्यात येणारी भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल (OFC) काही अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या चोरीमुळे दूरसंचार सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित विभागाने याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, बीएसएनएलमध्ये कार्यरत असलेले व्यवस्थापक बालासाहेब दत्तात्रय पाटेकर (वय ५७) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना ३० मे ते ३१ मे २०२६ दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे. चोरी झालेली केबल सुमारे ५०० मीटर लांबीची जेली फिल्ड अंडरग्राउंड केबल असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने भूमिगत केबल उकरून काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या केबल चोरीच्या घटनांमुळे दूरसंचार विभागासह नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिकरोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.