Nashik | प्रतिनिधी
Nashik : नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे टॉप्स हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुबाई रामसिंग राजपूत (वय ७०) या जेलरोड परिसरातील आपल्या घरी एकट्याच होत्या. ७ जुलै रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचा फायदा घेत दोन अज्ञात चोरटे घरात शिरले.
चोरट्यांनी महिलेच्या कानातील सुमारे १ ग्रॅम वजनाचे ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स तसेच गळ्यातील सुमारे २ ग्रॅम वजनाचे १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) व ३०९(६) अंतर्गत दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
#Nashik #NashikCrime #JailRoad #CrimeNews #BreakingNews #MBCMarathi #NashikRoad #MarathiNews #Police #GoldTheft #MaharashtraNews