नाशिक NDCC बँकेची कठोर कारवाई – थकबाकीदारांसह जामीनदारांचीही मालमत्ता जप्तीची तयारी!

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांवर कठोर पाऊल उचलत कर्जदारांसह जामीनदारांच्या मालमत्तांवरही जप्तीची कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

नाशिक: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (NDCC)थकबाकीदारांवरील वसुली मोहीम तीव्र करत जामीनदारांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदार कर्ज भरण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यांच्या जामीनदारांची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरू असून, त्यांच्या नावावर असलेल्या जमिनी शोधून कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जदारांकडे एकूण ₹२,२९२.९ कोटींची थकबाकी आहे, त्यात ₹९९१.०९ कोटी मुद्दल आणि ₹१,३०१.८२ कोटी व्याज आहे. विशेष म्हणजे, थकबाकीदारांपैकी ८४% कर्जदार हे पाच वर्षांहून अधिक काळापासून थकबाकीदार आहेत.

यापूर्वी बँकेने थेट कर्जदारांवरच वसुलीसाठी कारवाई केली होती. मात्र, कर्जदारांनी कर्ज फेडले नाही तर आता त्यांच्या जामीनदारांच्या मालमत्तांवरही बँकेची टाच येणार आहे. त्यांच्या नावावर असलेल्या जमिनी शोधून त्वरित जप्तीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

बँकेने कर्जदार आणि जामीनदार दोघांनाही इशारा दिला आहे की, जर त्यांनी कर्ज फेडले नाही, तर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे कर्जदारांनी आणि जामीनदारांनी लवकरात लवकर थकीत रक्कम भरावी, असे आवाहन बँकेने केले आहे.