औरंगजेबावर वक्तव्य आणि त्याचे पडसाद
Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलेल्या एका विधानामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता” असे वक्तव्य केल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या विधानानंतर विधानसभा गदारोळाने भरून गेली, आणि अखेर आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अबू आझमी (Abu Azmi) यांचे विधान काय होते?
“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही”, असे विधान अबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
निलंबनाची कारवाई
अबू आझमी यांच्या विधानावरून भाजप व शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. अनेकांनी अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र, यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
अबू आझमी यांचे विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र
निलंबनानंतर अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. मी विविध इतिहासकारांच्या आधारावर माझे मत मांडले. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी मनापासून आदर करतो.”
राजकीय प्रतिक्रिया आणि पुढील वाटचाल
अबू आझमी यांच्या विधानानंतर राज्यातील राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांनी अबू आझमी यांच्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने त्यांच्या मतांचे समर्थन केले आहे.
आता विधानसभा अध्यक्ष यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या प्रकरणाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो हेही पाहणे रंजक ठरेल.