नाशिक शहरातील महागड्या स्पोर्ट्स बाईक (Sports bike) चोरी प्रकरणात भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठे यश मिळवले असून, चार आरोपींना अटक करत सुमारे ९ लाख रुपयांच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शहरातील यश दिलीप ललवाणी (रा. जुने नाशिक) यांनी त्यांची हिरो करिझ्मा स्पोर्ट्स बाईक(sports bike)(MH-15-JV-8299) घरासमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली होती. या घटनेची तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सत्यवान पवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागला. शिर्डी येथे सापळा रचून गणेश बाबासाहेब गायकवाड (वय २०, रा. निमगाव निघोज, शिर्डी), अभिजित रामदास कांबळे (वय १९, रा. डाउच खुर्द, कोपरगाव) तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली हिरो करिझ्मा बाईकसह एकूण पाच स्पोर्ट्स बाईक (sports bike) जप्त केल्या. या बाईक नाशिक व संगमनेर येथून चोरीस गेल्या होत्या.
या उल्लेखनीय तपासात सपोनि सत्यवान पवार, पोहवा सतिष साळुंके, पोहवा कय्युम सैय्यद, पोशि निलेश विखे, पोशि गुरू गांगुर्डे, पोशि दयानंद सोनवणे, पोशि नारायण गवळी, पोशि धनंजय हासे, पोशि जावेद शेख यांनी सहभाग घेतला.
भद्रकाली पोलिसांच्या या कामगिरीमुळे नाशिकमधील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश मिळवण्यास मदत होणार आहे. पुढील तपास पोहवा कय्युम सैय्यद व गुन्हे शोध पथक करीत आहे.