नाशिक गुन्हे शाखेने विधानसभा तिकीटाच्या बहाण्याने 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना दिल्लीमध्ये अटक केली आहे. प्रमोद मिश्रा नावाने ओळखला जाणारा एक आरोपी, स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून, नाशिक आणि इतर विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना विधानसभेचे तिकीट मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत होता. त्याने खोटे पत्र दाखवून 50 लाख रुपये न दिल्यास राज्यभरात बदनामी करण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने दिल्लीत शोधमोहीम राबवली. तांत्रिक माहितीच्या आधारे सर्वेश मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनु (गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि गौरव नाथ (दिल्ली) यांना अटक करण्यात आली.
या आरोपींवर दिल्लीतील स्पेशल सेलमध्ये आधीच गुन्हा दाखल असल्याने, त्यांना प्रथम दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांत त्यांची अटक करण्यात आली असून, त्यांना 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या यशस्वी कारवाईत सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पो. हवा. प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, शरद सोनवणे, आणि जगेश्वर बोरसे या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.