पत्नीकडे वाईट नजरेने बघत मोबाईल नंबर मागणाऱ्या शेजाऱ्याला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. यावरून झालेल्या वादात शेजारी राहणाऱ्या संशयिताने तरुणाच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला, तर त्याच्या सोबत असलेल्या तीन महिलांनी तुझा गेमच करतो, तुला आज जिवंत सोडत नाही अशी धमकी देत घराच्या दरवाजा व खिडकीवर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना जेल रोड परिसरातील खर्जुल मळा येथे घडली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन सोनाजी पाडेवार (वय २९, रा. युवराज बर्षे यांची खोली, खर्जुल मळा, जेल रोड, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी पवन पाडेवार हे नेहमीप्रमाणे काम संपवून घरी आले. त्यावेळी त्यांच्या पत्नीने सांगितले की, शेजारी राहणारा सागर जाधव हा नेहमी माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो. आज त्याने माझ्याकडे मोबाईल नंबर मागितला, पण मी दिला नाही. या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी पवन हे सागर जाधव याच्याकडे गेले. जाब विचारल्याचा राग आल्याने संशयित सागर जाधव, समोर राहणारी शोभा बाविस्कर, तिची सून अश्विनी घेरगील आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी महिलेने पवन यांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. मारहाण सुरू असतानाच सागर जाधव याने पवन यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला कडाडून चावा घेतला. यात बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पवन यांनी धावत जाऊन स्वतःला घरात कोंडून घेतले आणि आतून कडी लावली. मात्र, तरीही संशयितांचा राग शांत झाला नाही. सागर जाधव आणि तिन्ही महिलांनी पवन यांच्या खोलीच्या दरवाजावर आणि खिडकीवर फरशीचे तुकडे आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. तू बाहेर तुझा गेमच करतो, तुला आज जिवंत सोडणार नाही अशी घोषणाबाजी करत संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटून घरात पडल्या.
दगडफेक इतकी प्रचंड होती की, जर तो दगड किंवा काच पवन, त्यांची पत्नी अथवा १८ महिन्यांच्या चिमुरडीला लागली असती, तर त्यांचा जीव गेला असता. घाबरलेल्या पवन यांनी तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली. माहिती मिळताच उपनगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची गाडी येताच संशयित शांत झाले. या प्रकरणी पवन पाडेवार यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात सागर जाधव, शोभा बाविस्कर, अश्विनी घेरगील आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने करत आहेत.